मुबई (प्रतिनिधी): प्रसिद्ध चित्रकार नंदिनी बजेकल यांचे एकल चित्रप्रदर्शन “द वे माऊंटन्स टॉक” या शीर्षकांतर्गत मुंबईत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई येथे भरविण्यात आले आहे. पौर्वात्य कलेचे उत्तम दर्शन घडवणारे हे विलोभनीय पर्वतांचे प्रदर्शन रसिकांना दि. ७ ते १३ जानेवारी, २०२५ या कालावधीत ११ ते ७ या वेळेत कलारसिकांना पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री. परवेज दमानिया (प्रसिद्ध उद्योगपती आणि कला संग्राहक), सौ. रोशनी दमानिया (समाजसेविका), प्रविण कडले (संस्थापक व अध्यक्ष प्रचेतास कॅपिटल प्रायवेट लि), सौ. चेतना कडले (चित्रकार व संस्थापिका ऋत्विक फाऊंडेशन). श्री. अच्युत पालव (प्रसिद्ध कॅलिग्राफर) यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चित्रकार नंदिनी बजेकल यांची ही चित्रं चायनीज ब्रश पेंटिंग या प्रकारात केलेली आहेत. हा कला प्रकार अत्यंत प्राचीन असून चीनमध्ये सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी त्याची सुरुवात झाली. यात राइसपेपर आणि जलरंग, विशिष्ट प्रकारच्या इंक वापरुन पारंपारिक शैलीत चित्रं काढली जातात. भारतात या कलाप्रकाराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, तसंच या शैलीतील चित्रं सहसा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे हे प्रदर्शन यासाठी एक सुसंधी आहे.
चित्रकार नंदिनी बजेकल यांनी या शैलीचं सिंगापूरमघ्ये सुमारे अठ्ठावीस वर्षें प्रशिक्षण घेतलं आहे. नंदिनी म्हणतात, "प्रत्येक पर्वताला स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व असतं. ती उत्तुंग शिखरं काही बोलत असतात. त्यांच्या कडेकपाऱ्यातून, दऱ्याखोऱ्यातून स्वर येतात. पर्वतांना जणू स्वतःच्या भावभावना असतात. मी काया वाचा मनाने त्यांना पाहते, ऐकते, निरखते. मग मला ती कळतात असं वाटतं." केवळ बाह्य सौंदर्यच नाही, तर नंदिनी यांना पर्वतांच्या नाजूक झालेल्या नैसर्गिक स्थितीबद्दल सुद्धा जाणीव आहे. त्यांच्या चित्रांमधून त्त्या निसर्गरक्षणाची गरज, पशुपक्ष्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणं, यावरही हलकेच भाष्य करतात. हे निव्वळ एक प्रदर्शन नसून ती पर्वतांच्या अस्तित्वासाठी व्यक्त केलेली एक भावना आहे, त्यांना दिलेली मानवंदना आहे.
Website: www.nandinibajekal.com