मुंबई,15 फेब्रुवारी, 2024 (AMN): द शापूरजी पालोनजी ग्रुप हा भारतातील अग्रगण्य व्यवसाय समूह असून त्यांच्या वतीने मध्य-पूर्वेत पहिल्या हिंदू देवालयाचा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. अबू धाबी येथील बीएपीएस (BAPS) हिंदू मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारी 2024 रोजी सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य सोहळ्यादरम्यान करण्यात आले. सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेला चालना देण्यासाठी तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो.
वास्तुकलेचा एक चमत्कार असलेले हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीच्या वालुकामय भूप्रदेशावर उभारलेले आहे. हे ठिकाण अबू धाबीच्या बाहेर 27 एकर वाळवंटात वसलेले असून उभारणी कामात अबू धाबीचे तत्कालीन युवराज हिज हायनेस शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी दिलेल्या उदार देणगीबद्दल त्यांचे अनेक आभार!
सर्व धर्म-पंथियांकरिता या मंदिराचे दरवाजे खुले असतील. जगभर तसेच भारतात काही स्वामीनारायण देवालये उभरणाऱ्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या माध्यमातून मंदिर उभारणीचा उपक्रम राबविण्यात आला. देवालयाचे बांधकाम म्हणजे भारताची संस्कृती, वास्तुकला आणि शिल्पकलेतील प्राचीन कौशल्याचा पुरावा आहे. हे शतकानुशतके जुन्या भारतीय ग्रंथांनुसार पद्धतशीर बांधण्यात आले आहे. कमळ ही देवालय वास्तूच्या उभारणीमागील प्रेरणास्थान म्हणावे लागेल. मंदिराला 7 शिखरे आहेत, जी संयुक्त अरब अमिरातीच्या 7 अमिरातींचे प्रतिनिधित्व करतात.
“अबू धाबी येथे हिंदू देवालय बांधण्याचे आमचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. शुष्क वाळवंटात कमळ उमळविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी शापूरजी पालोनजी यांनी आमच्या सोबत भागीदारी करत मोठा वाटा उचलला. जागतिक सलोख्यासाठी या आध्यात्मिक मरूद्यानाचे आमचे स्वप्न साकार केल्याबद्दल आम्ही शापूरजी पालोनजी यांचे आभार मानतो,” असे उदगार बीएपीएसचे संचालक प्रणव देसाई यांनी काढले.
"आम्हाला, शापूरजी पालोनजी येथे, बीएपीएस बरोबर काम करण्याची तसेच कला, सलोखा आणि श्रद्धा एकत्र आणणारे हे अविश्वसनीय स्मारक तयार करण्याची संधी लाभली, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. हे मंदिर म्हणजे सांस्कृतिक विविधतेचा उत्सव तर आहेच; शिवाय हा आमच्या अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावा आहे, असे शापूरजी पालोनजी ग्रुपचे अध्यक्ष शापूरजी पी मिस्त्री म्हणाले.
या प्रकल्पात शापूरजी पालोनजी यांनी सुरक्षा, प्रकाश व्यवस्था आणि वातानुकूलन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन भारतीय वास्तुकलेच्या पारंपरिक गरजा यांची यशस्वी सांगड साधली आहे.
देवालय परिसरात 7 आणखी इमारती असून नियमित 15,000 हून अधिक व्यक्ती भेट देतील. इथे गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तीन प्रमुख नद्यांचे प्रतिनिधित्व करणारे जलस्रोत तयार करण्यात आले आहेत. मुख्य मंदिराची उभारणी तराफ्याच्या पायावर करण्यात आली असून संयुक्त अरब अमिरातीमधील फ्लाय-अॅश काँक्रीटच्या सर्वात मोठ्या सिंगल पोअर तंत्राचा वापर यामध्ये दिसतो. लोखंड आणि पोलाद मजबुतीकरणाऐवजी बांबूच्या काठ्या आणि ग्लास फायबरचा वापर करण्यात आला.
देवालयाचा ढाचा या पायावर उभारला गेला, ज्यामध्ये बीएपीएस करिता इटलीतून मागविण्यात आलेल्या 40,000 क्युबिक मीटर संगमरवराचा तसेच राजस्थानच्या 1,80,000 क्युबिक मीटर पिंक सॅंडस्टोनचा वापर करण्यात आला. बीएपीएस मंदिर निर्मितीकरिता हजारो कलाकार आणि स्वयंसेवक राजस्थानात दगडावर कोरीवकाम करण्यात गुंतले होते. त्यानंतर हे दगड अबू धाबी येथे आणल्यावर भव्य जिग-सॉ पझलसारखे एकत्र ठेवण्यात आले.
शापूरजी पालोनजी समूह तब्बल 159 वर्षे जुना असून जगभरातील वास्तूकलेचे काही सर्वोत्तम नमुने त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी 1975 मध्ये मस्कतमधील सुलतानचा राजवाडा उभारला. तो मध्यपूर्वेत जवळपास 50 वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यांचे भारतातील त्याचे अलीकडील काही प्रमुख प्रकल्प म्हणजे नवी दिल्लीतील भारत मंडपम आणि कर्तव्य पथ, पोर्ट ब्लेअर विमानतळ आणि हिमाचल प्रदेशातील अटल बोगदा.
=======================================================
No comments:
Post a Comment