Monday, July 1, 2024

राज्याच्या प्रगतीला अजितदादांचा बुस्टर -अतिरिक्त अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, पर्यटन, गुंतवणूक, उद्योगांवर भर


मुंबई, प्रतिनिधी (आदर्श महाराष्ट्र): राज्याच्या विकासाची नस जाणणारा माणूस, कामाचा माणूस, प्रशासनावर वचक असणारा माणूस, राज्याच्या आर्थिक सुधारणेला गती देणारा नेता अशी ओळख असलेलं नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते.

शुक्रवारी (दि.२७) रोजी अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून १० वा अर्थसंकल्प सादर केला.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, युवा अशा घटकांचा आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प मांडत असताना राज्याच्या प्रगती आणि विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या. 

अजितदादा पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचा आणि विकासाचा एक प्रमुख चेहरा आहेत.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रीत करुन राज्याच्या प्रगतीचा वेग साधला आहे.

त्यांनी नुकत्याच मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात देखील त्यांच्या नेतृत्वाची छाप दिसून येते. 

महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीसाठी अनेक योजना आणि घोषणा त्यांनी या अर्थसंकल्पातून केल्या आहेत.  

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख शहरांच्या वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेऊन या वर्षात ३७ किलोमिटर लांबीच्या मेट्रो मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

मुंबईतील शिवडी- वरळी जोड रस्त्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा अजितदादा यांनी केली आहे. 

मुंबईला लागून असणाऱ्या ठाणे शहरासाठी ठाणे किनारी मार्ग (कोस्टल रोड) मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. 

हा मार्ग १३.४५ किलोमिटर लांबीचा असून ३ हजार ३६४ कोटी रुपये किंमतीचे हे काम आहे. 

शहरी भागातील रस्त्यांचा विचार करत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील ४ हजार १९७ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. 

तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पुढील ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. 

ग्रामीण भागातील दुर्गम भाग, वाड्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अनेक योजना राज्यसरकार राबवत आहे.

त्यापैकी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेसाठी १ हजार ४०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 

संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्याची घोषणा अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. 

राज्यात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारवाढीला चालणा देण्यासाठी थ्रस्ट सेक्टरमध्ये अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, त्याव्दारे ५० हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील महापे येथे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यात २ हजार सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा समावेश असणार आहे. 

त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून जवळपास १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. 

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाव्दारे पाच वर्षात (सन २०२८) पर्यंत २५ हजार कोटींची गुंतवणूक करुन ५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

हरित हायड्रोजमध्ये २ लाख ११ हजार ४०० कोटींची गुंतवणूक आणि ५५ हजार ९०० रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. 

- सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय पाणबूडी प्रकल्प 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारण्याची घोषणा

अजितदादांनी अर्थसंकल्पात केली आहे. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून या केंद्रामुळे जवळपास ८०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

त्याच प्रमाणे वेंगुर्ला येथे ६६ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय पाणबूडी प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे. 

- सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना

पश्चिम घाटाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ३८१ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. 

शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक नामांकनासाठी प्रस्ताव

जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन १२ किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला असून, 

कोकणातील कातळशिल्पे, पंढरीची वारी, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सवाबाबतचे प्रस्ताव देखील युनेस्कोकडे पाठविण्यात येणार आहेत. 

- स्मारके आणि इतर

नागपूर जिल्ह्यातील पावडदौना येथे अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी स्मारकासाठी ७७ कोटी रुपयांचा विकास आराखडा करणार. 

कल्याण-नगर मार्ग माळशेज घाटात अत्याधुनिक व्ह्युईंग गॅलरी उभारणार.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेथे ज्ञानेश्वरीची रचना केली त्या नेवासा मंदिर परीसराचा विकास आराखडा करणार. 

कोल्हापूरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारणार

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्ली येथे संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ येथे स्मारक उभारणार

आदिवासी कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हतगड (ता. सुरगाणा) येथे कलादालन स्थापन करणार.

No comments:

Post a Comment

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...